"फरदड - शोषितांच्या होरपळीच्या कथा"
" फरदड - शोषितांच्या होरपळीच्या कथा "
शेतकरी बांधवांचे दारिद्र्य, त्यांची दुरावस्था, त्यांच्या जीवनाची होरपळ कथा / कविता / कादंबरीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील कितीतरी कवी -लेखक मांडत आहेत. अगदी ज्येष्ठ लेखक प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. भास्कर चंदनशिव यांच्यापासून कृष्णात खोत, ' फेसाटी ' कार नवनाथ गोरे यांच्यापर्यंत ही परंपरा सांगता येईल. मराठवाड्यात डॉ.आसाराम लोमटे, प्रा.केशव सखाराम देशमुख, डॉ. भीमराव वाघचौरे,प्रा.इंद्रजित भालेराव, विजय जावळे, उत्तम बावस्कर,उमेश मोहिते, भास्कर बडे, सरदार जाधव यांच्यानंतर लिहीणाऱ्यांची एक पिढीच गेल्या दशकात उदयास आली आहे. राजेंद्र गहाळ, अशोक गायकवाड, अब्दुल हकीम, राजेश रेवले, मेनका धुमाळे, अनिता येलमटे ही काही आजच्या पिढीतील नांवे असून श्री. शिरीष पद्माकर देशमुख हे त्यांच्यातीलच एक नांव ! कवी म्हणून सुपरिचित झालेल्या श्री. शिरीष पद्माकर देशमुख यांचा ' फरदड ' हा पहिलाच कथासंग्रह. यातल्या कथा शेतकरी -कष्टकरी वर्गाच्या अपार आणि असीम कष्टाच्या आहेत. त्यांचे सावकाराकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारे शोषण चित्रीत करणाऱ्या आहेत. अस्मानी संकटांमुळे शेतकऱ्यांची होणारी वाताहत चित्रित करणाऱ्या या कथा आहेत. शेतकरीवर्गातील आपसातील क्षुद्र हेवे -दावेही या कथा मांडतात.तसेच निरक्षर कष्टकरी लोकात असणाऱ्या अंधश्रद्धा, कर्मकांड यांवरही नेमकेपणाने या कथा बोटही ठेवतात. शेतकऱ्यांच्या व्यसनाधिनतेवरही प्रकाशदेखील या कथा टाकतात. थोडक्यात कष्टकरी शेतकरीविश्वाची सुख - दुःखे,हर्ष- विमर्श संवेदनशीलतेने टिपणारी ही कथा असून ग्रामीण परिसर आणि ग्रामीण माणसे यांची सजग जाण लेखकाला असल्याचे जाणवते.आणि या कष्टकऱ्यांविषयी जाणवणाऱ्या ओलाव्यातूनच ग्रामीण कष्टकऱ्यांचे रोजचे अपार कष्ट, शोषण आणि त्यांची होणारी वाताहत लेखक आत्मियतेने मांडतो आहे, हे नक्की!
शेतकऱ्यांचे अस्मानी -सुल्तानी संकटांमुळे होणारे शोषण हा ' फरदड ' या कथेचा विषय आहे.
सावकाराच्या तगाद्यामुळे आबा फेडरेशनला कापूस घेऊन येतो तेंव्हा त्याला ग्रेडर पाचशेची लाच मागतो. आबा नकार देताच ' फरदड कापूस ' ( हलक्या दर्जाचा ) म्हणून अडीच हजारांऐवजी पंधराशेच भाव आबाच्या कापसाला मिळतो. आबा कष्टी मनाने घरी परततो तेंव्हा बैलांना मारहाण करून त्यांच्यावर राग काढतो. पण निम्म्:या रात्री मात्र गोठ्यात जाऊन बैलांजवळ दुःख हलके करतो. अशी ही सर्वागसुंदर कथा लेखकाने छोटया निवेदकाच्या निवेदनातून मांडल्यामुळे या कथेची परिणामकारकता वाढली आहे.आबाच्या मुलाचे भावविश्व अगदी तपशीलांसह उजागर झाले आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या वाताहतीची ही कथा वाचून मन द्रवल्याशिवाय राहत नाही. ' गहाण ' ही कथा ग्रामीण परिसरातील निवडणूकांचे वास्तव स्पष्ट करणारी आहे. आज कुठलीही निवडणूक असली की, पैसे वाटप केले जातात. सदा नावाच्या एका बिनकामाच्या माणसाची मतदानाच्या बदल्यात ससेहोलपट होते कारण त्याला पैशांच्याऐवजी दारुची बाटली दिली जाते. लेखकाने या कथेतून आजच्या मतांच्या राजकारणावर झोत टाकला आहे. ' मन्या ' ही एका गरीबघरच्या मुलाची कथा वाचून मन हेलावते. हा शाळकरी मन्या मढयावर उधळलेले पैसे गोळा करतो आणि त्या पैशांची आईला नवी चप्पल आणतो. लेखकाने ही कथा नेमक्या संवादांमधून फुलवली आहे. या कथेव्दारे लेखकाने ग्रामीण परिसरातील दारिद्रयाची भीषणता दर्शवली आहे. हिम्मतबाज आणि नेक स्वभावाची गवळी ' नखी ' कथेत आढळते. व्यसनी नवरा व्याभिचार करायला सांगतो तेंव्हा ही गवळी स्वतःला संपवते पण बदनाम होत नाही. अशी ही गवळी तिच्या चांगुलपणामुळे मनात रुंजी घालते. ' बारव ' ही काहीशी गूढ वाटणारी कथा अंधश्रद्धेवर प्रहार करणारी आहे. अंधश्रद्धाळू बाप आणि विज्ञानवादी सुशिक्षित मुलगा यांच्यात बारवेचे पाणी आटते तेंव्हा तंटा होतो. त्यांच्यातील ह्या संघर्षाचा लेखकाने नेमकेपणाने इथे वेध घेऊन वास्तव मांडले आहे. ' रेघा ' कथेमधे एका म्हताऱ्या विधवा स्त्रीची कहाणी आहे. तिच्या पतीने दहा हजार कर्ज घेतलेले असते आणि त्याच्यामाघारी कर्जमुक्तीची घोषणा झाल्यावर ती ऑनलाईन फॉर्म भरायला येते. पण तिचे ठसे अॅक्सेप्ट होत नाहीत. कारण तिच्या बोटांना रेघाच नसतात. तेंव्हा निवेदक खोटी गोष्ट करण्याचा सल्ला देतो तेंव्हा म्हतारी नकार देते.या कथेमधून लेखकाने शेतकरीवर्गाच्या ईमानदार मनाचा वेध घेतला आहे. ' शिकार ' कथेत गजानन पारधेची करुण कहाणी आहे. त्याचा बाप, कचरू ससे, चितरं पकडीत असतो आणि या धंदयातच त्याला कायमचे अपंगत्त्व आलेले असते. त्यामुळे शंभर रुपयाची प्रयोग वही देखील तो मुलाला घेऊन देऊ शकत नसतो. गजाचे शिक्षक प्रयोग वही आणण्याचा खूपच आग्रह धरतात तेंव्हा कचरू रात्रीच्या वेळी पिंजरा घेऊन शिकारीला जातो आणि भयाण अंधारात त्याचीच शिकार होते. गावकरी चोर समजून त्यांना मारहाण करतात. भटक्या निर्धन लोकांच्या जीवनावर ही कथा उजेड टाकते. कष्टकरी रामभाऊची गोष्ट ' गोचीड ' कथा आहे. पाचवीला पुजलेल्या दारिद्रयामुळे त्याला जीवन जगणे कठीण झालेले असते. गाय जगवायची की माय या कोड्यात शेवटी गाईचा अंत होतो तेंव्हा गाईच्या आचळातील गोचीड बघून स्वतःच्या आयुष्यालाही दारिद्रयाचा गोचीड चिकटल्याचा भास त्याला होतो. अशी ही शेतकरी जीवनाचे धगधगते वास्तव दर्शवणारी कथा आहे. तात्या नावाच्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आयुष्याच्या झालेल्या परवडीची कहाणी ' आधार -निराधार ' कथेत अनुभवायला येते.तात्याने तीन एक्कर जमीन गहाण ठेवून एक लाखाचे कर्ज काढलेले असते. त्यातच सरकारी कर्जमाफीची घोषणा होते तेव्हा तात्या पत्नीला मयत दाखवतो.नंतर मात्र सरकारी चौकशी होईल म्हणून धसका घेतो. त्याला अन्न -पाणी गोड लागत नाही. त्याची पत्नी विचारते तेंव्हा तो तिला सांगतो आणि त्याच रात्री त्याची पत्नी कापसावर फवारण्याचे औषध प्राशन करुन स्वतःला संपवते आणि तात्याला निराधार करुन जाते. अशी ही डोळे पाणावून टाकणारी कथा अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आजचे वास्तव टिपते. जन्मदात्या पित्याला धडा शिकवणारी ' दुर्गा ' भावल्याशिवाय राहत नाही. ग्रामीण भागातही शहरी संस्कारांची लागण झालेली आहे. त्यामुळे स्वतःच्या वडिलाला न सांभाळणाऱ्या दोन्ही मुलांना वठणीवर आणणारा जिद्दी म्हतारा आबा ' पोटच्या गोळ्याची गोष्ट ' मधे वाचकमन नक्कीच सुखावून जाणारा आहे. ' धुरा ' ही छोटेखानी कथा कुणब्याच्या आयुष्याची आज होणारी ससेहोलपट नेमकेपणाने मांडते. दोघे सख्खे भाऊ धुरा (बांध ) कोरला म्हणून भांडतात. पोलीस केस,कोर्ट- कचेऱ्या करतात आणि जिद्दीला पडलेले दोघेही शेत सावकाराच्या घश्यात घालून भूमिहीन होतात. चार लग्नाला आलेल्या मुलींच्या बापाची मन पिळवटून टाकणारी कहाणी ' निरोप ' मधे वाचायला मिळते आणि गरिबांना कोणीच वाली नसते, म्हणतात ते पटते. सततच्या नापिकीमुळे हैराण झालेला आबा जित्राबाला वैरण- काडी करण्यासाठीही मोताद होतो आणि कोठयातल्या जित्राबाकडे बघत राहतो. ' ऊन - पाऊस ' ही कथा अल्पभूधारक शेतकरी कर्जाच्या गाळात कसा रुतत जातो, याचे चित्रण करतानाच भाऊबंदकीवरही उजेड टाकते. ' कावळे ' ही रूपक कथेचा साज घेतलेली कथा माणसातील विविध अपप्रवृत्तींवर झोत टाकून अंधश्रध्देतील निष्फळपणावर भाष्यही करणारी आहे.
' फरदड ' कथासंग्रहात निवेदन नागरी भाषेत असून संवाद मराठवाडी बोलीत आहेत. त्यामुळे वाचकांसाठी हे छानच झाले आहे. मराठवाडी बोलीभाषेतील ' फरदड ' , ' चिपाट ' , ' च- हाट ' , ' कुडतं ' , ' चिंधूक ' , ' वायली ' , ' कतई ' , ' भूरकी ' सारखे शब्द वाचनानंद देणारे आहेत. संवादातील नेटकेपणामुळे कथेची खुमारी वाढली आहे.
थोडक्यात ' फरदड ' मधील श्री. शिरीष पद्माकर देशमुख यांची कथा माफक निवेदन आणि ओघवत्या व चित्रमय शैलीत नेटक्या संवादामधून अभिव्यक्त होते आणि त्यामुळे ती भावस्पर्शी झाली आहे व वाचकमन अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. हेच या कथेचे यश आहे.बारोमास राबणारा कष्टकरी शेतकरी, त्याची सुख - दुःखे, त्याच्या जगण्यातील होरपळ, ग्रामीण राजकारणातून त्याचे होणारे शोषण, सावकारी विळखा, नापिकी आणि सततचा दुष्काळ, भाऊबंदकी आदी त्याला त्रस्त करणाऱ्या बाबींचा आडवा -उभा आलेख संवेदनशीलतेने ही कथा मांडते.म्हणूनच म्हणावेसे वाटते की, लेखक श्री. शिरीष पद्माकर देशमुख यांची ही कथा शेतकरी व कष्टकरी यांच्या समस्याग्रस्त व हलाखीग्रस्त जगण्याचा समग्रतेने वेध घेते.ही कथा वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, अशी आशा करतो व त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा देतो.
श्री. उमेश मोहिते,
प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक,
Comments
Post a Comment