" सहज भावनांची शब्दफुले "

" सहज भावनांची शब्दफुले "


मला असं वाटतं की ज्याला दुसऱ्यांच्या वेदना कळतात अशा प्रत्येक संवेदनशील माणसामध्ये एक कवी दडलेला असतो. बऱ्याचदा तो बाहेर पडतो कित्येकांच्या बाबतीत तो मनातच दडून राहतो. पण खरंतर आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देण्याचं माध्यम प्रत्येकाने शोधलं पाहिजे. कारण मनात दडपलेल्या बऱ्याचशा भावना आतल्या आतच गुदमरून जातात आणि त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्वही कुठेतरी संकोचून गेल्यासारखं वाटतं. आयुष्याला आनंदाने तोंड देण्यासाठी आपली व्यक्त होण्याची माध्यमं आपण ठरवून घेतली पाहिजेत. हे सगळं आज मांडण्यासाठी निमित्त ठरलाय नुकताच वाचनात आलेला एक कवितासंग्रह. कवी डॉ. गोपाळ विठोबा तुपकर रचित 'अंतरीची शब्दफुले'.
           डॉ. तुपकर सर पेशाने प्राथमिक शिक्षक आहेत. खरं तर आपण डॉक्टर व्हायचं अशी त्यांची दृढ इच्छा होती. बुद्धिमत्ता दांडगी असूनही आर्थिक गणित न जुळल्यामुळे त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही. ते शिक्षक झाले. परंतू डॉक्टर होण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच की काय नावापुढे डॉ. लावण्याचा वेगळा पर्याय त्यांनी निवडला आणि इतिहास या विषयात त्यांनी पीएच.डी मिळवली. असा हा स्वभावतः जिद्दी आणि बुद्धिमान माणूस मुळातच अत्यंत हळवा आहे. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर त्यांनी दुःखाचे डोंगर पचवलेत. या वेदना पचवताना अर्थातच साथीला होते त्यांचे शब्द. या सर्व भावनांचा मूर्त शब्दाविष्कार म्हणजेच अंतरीची शब्दफुले!
       या कवितासंग्रहात डॉ गोपाळ तुपकर यांच्या एकूण ४९ कविता वाचायला मिळतात. या कवितांची भाषा खूप साधी, सोपी आणि सरळ आहे. तिच्यात कुठेही क्लिष्टता नाही. प्रतिमा - प्रतिकांची गुंतागुंत नाही. मनात उमटलेल्या भावना थेटपणे कागदावर उतरलेल्या आहेत.
एकटं चालायचो तेव्हा
कधी एकटं वाटलं नाही
अनवाणीच फिरायचो तेव्हा
पाय कधी पोळले नाही.
इतक्या साध्या शब्दांत, अगदी यमकांच्या फेऱ्यातही न अडकता कवी आपली कहाणी मांडत जातो. आयुष्याच्या वाटचालीचा हिशेब मांडताना कवी म्हणतो,
किती गेले किती राहिले
गणतीच कधी केली नाही.
उरल्यासुरल्याची आशा धरून
कवटाळून कधी बसलो नाही.
       जीवनाच्या अनुभवांना शब्दबद्ध करताना कवीचं आपल्या काव्यरचनांवर मात्र विलक्षण प्रेम आहे. आणि आपल्या कवितांबद्दल अभिमान देखील. म्हणूनच तो लिहून जातो,
मोडेन पण वाकणार नाही
स्वातंत्र्यास मुकणार नाही
अस्तित्व कधी विसरणार नाही
जात माझ्या कवितेची!
     या संग्रहात भावकविता आहेत, प्रेमकविता आहेत, आयुष्याने मांडलेल्या व्यथांचे अनुभव कथन आहे. जे आहे ते साध्या सोप्या आणि थेट शब्दात आहे. कदाचित त्यामुळेच स्वतःचं साधेपण मांडताना कवी म्हणतो,
वेडा कसा बनू मी
ज्ञानीच खूप झाले
कोडेच कोडे आहे
माझे मला कळेना!
         तर अशी ही 'अंतरीची शब्दफुले'. एका कवीमनात उमटलेल्या सहजभावनांची सुगंधित शब्दफुले. या कविता शब्दबंबाळ नाहीत. या कविता जगण्याचं खूप मोठं तत्वज्ञान मांडतात असंही नाही. यात अवास्तव दुःखाच्या अतिरंजित कहाण्याही नाहीत. एका साध्या सामान्य माणसानं जगण्याकडे बघताना त्याला जे जाणवलं ते सगळं अगदी कवी वगैरे असण्याचा अभिनिवेश न बाळगता मांडलेलं आहे. त्यामुळेच की काय या निखळ भावना सहज उमगतात!
           कु प्रणाली पांडूरंग वगदे या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या छोट्या मैत्रीणीनं या पुस्तकाचं छानसं मुखपृष्ठ तयार केलंय. कवीच्या मनातल्या भावना तिच्या रंगरेषांमधून अचूक उतरल्यात असे जाणवते. मंठा येथील साहित्यिका प्रा सौ शोभा डहाळे यांनी काव्यसंग्रहाची नेमकेपणाने पाठराखण केली आहे.  'बाप नावाची माय' या आत्मचरित्रामुळे चर्चेत असलेले, परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजेश गायकवाड यांनी या संग्रहाची समयोचित प्रस्तावना लिहिली आहे. एकूणच मंठ्यासारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या डॉ गोपाळ विठोबा तुपकर यांचा हा कवितासंग्रह एकवेळ वाचावा असा नक्कीच झाला आहे. त्यांच्या पुढील वाङ्मयीन वाटचालीसाठी शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव - अंतरीची शब्दफुले
कवी - डॉ गोपाळ विठोबा तुपकर
पृष्ठे - ६४
मूल्य - ७० रूपये
संपर्क - ९४०४६१७०११

पुस्तक परिचय -
शिरीष पद्माकर देशमुख
मंगरूळ ता मंठा जि जालना
मो. ७५८८७०३७१६

Comments