" सहज, सोप्या, सुंदर संस्कारकथा - लाल दिनांक"



" सहज सोप्या सुंदर संस्कार कथा - लाल दिनांक "


ज्येष्ठ विनोदी साहित्यिक म्हणून श्री नागेश शेवाळकर मराठी साहित्य विश्वाला सुपरिचित आहेत. अर्थात त्यांची ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ते उत्तम चरित्रकार आहेत. आणि मुलांच्या भावविश्वात रममाण होऊन लिहिणारे बालसाहित्य निर्माते देखील आहेत. त्यांच्या श्यामच्या छान छान गोष्टी महाराष्ट्र भरातील शाळांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या आहेत. यावेळी त्यांनी बालकांसाठी अशाच छानदार गोष्टींचं पुस्तक आणलंय. ज्याचं नाव आहे - लाल दिनांक. लाल दिनांक म्हणजे सुटीचा दिवस. मुलांच्या आवडीचा दिवस. म्हणूनच तर नव्या वर्षाचं कॅलेंडर घरात आलं की ही छोटी मंडळी लाल दिनांकाचा शोध घेत राहते.
      या कथासंग्रहात छोट्या छोट्या १५ कथा वाचायला मिळतात. यातली प्रत्येक कथा बालवाचकांना आवडेल अशीच आहे. शेवाळकर सर स्वतः शिक्षक राहिलेले आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. शाळकरी मुलांच्या आवडीनिवडीचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे. त्यामुळे मुलांना वाचायला काय आवडतं हे समजून घेऊनच या संग्रहातील कथांची मांडणी लेखकाने केली आहे. मग त्यामध्ये नातवासाठी धडपडणाऱ्या मिस आजींची पहिली कथा असेल किंवा आजीचा जीव वाचवणाऱ्या नातवाची शेवटची कथा असेल. लेखकाने साध्या सोप्या शब्दांत प्रेमळ नातेसंबंधांवर भाष्य केले आहे.
     'पंख मायेचे' या कथेत आजीला छळणारा पण तेवढेच आजीवर प्रेमही करणारा माधव भेटतो. एकोणतीस फेब्रुवारीला वाढदिवस असल्यामुळे नाराज होणाऱ्या सचिनची एक वेगळी गोष्टही वाचायला मिळते. निसर्गाची काळजी वाहणारा श्याम, अभ्यासू राम, विचित्र पद्धतीने विचार करणारा प्रकाश, प्रामाणिक विश्वास, कॅलेंडर वर सगळे दिनांक लालच हवेत म्हणणारा युवराज, आईवडिलांना देवापेक्षा श्रेष्ठ मानणारा श्रावण, खोडकरपणा सोडून अभ्यासाकडे वळणारा अमित, ओळखपत्रासाठी हट्ट करणारा अजित अशी एक ना अनेक गुणी मुलं या संग्रहातून भेटत राहतात. काहीतरी चांगली शिकवण देऊन जातात.
      ' लाल दिनांक ' या संग्रहातील प्रत्येक कथा संस्कारक्षम आहे. प्रत्येक कथा चांगला संदेश देऊन जाणारी आहे. सध्याच्या काळात मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी जाऊ पाहणाऱ्या बालकांना वाचनाकडे वळविण्याच्या दृष्टीने या कथा महत्वाच्या आहेत. या गोष्टी वाचल्यानंतर मुलांचं मनोरंजन तर होतेच, सोबतच सकारात्मक दिशेने विचार करण्याची एक दृष्टी प्राप्त होते. हेच या छोट्या छोट्या गोष्टींचं मोठं यश आहे. पुस्तकाचं आकर्षक, समर्पक मुखपृष्ठ स्नेहा गोगटे यांनी केलंय. तर कथांच्या अनुषंगाने योग्य अशी अंतर्गत चित्रे अमेय देशपांडे यांनी रेखाटली आहेत. हे पुस्तक लहान मुलं हाताळणार आहेत हे लक्षात घेऊन कागद अधिक चांगल्या दर्जाचा वापरायला हवा होता हे यानिमित्ताने सुचवावेसे वाटते. लेखक श्री. नागेश शेवाळकर सरांच्या हातून बालसाहित्याच्या क्षेत्रात मोठं काम घडावं हीच सदिच्छा आणि शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव - 'लाल दिनांक'
लेखक - नागेश सु. शेवाळकर
प्रकाशक - सोहम क्रिएशन अॅन्ड पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ - स्नेहा सुरेंद्र गोगटे
पृष्ठे - १२०
मूल्य - १५० रू.

पुस्तक परिचय -
शिरीष पद्माकर देशमुख

मंगरूळ ता मंठा जि जालना
मो. 7588703716

Comments